कृषी प्रधान देशात शेतकरी नेहमीच भरडला जातो. हा देश भक्त नावाला कृषी प्रधान उरला की काय अशी शंका उपस्थित झाली आहे. शेतात कष्ट करून शेतमाल बाजारात विकल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात काय उरते हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असतानाही आजही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकलेला नाही. इच्छा नसतानाही शेतीचा खर्च इतका वाढतो की शेतकऱ्याला उत्पंनातून काहीच मिळत नाही. असाच एक प्रकार कर्नाटकातूनही समोर आला आहे. गदग जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने ४१५ किमीचा प्रवास केला. बंगळुरूच्या मंडईत जाण्याचा निर्णय घेतला, पण जेव्हा त्याने बंगळुरूच्या यशवंतपूर मंडईत २०५ किलो कांदा विकला तेव्हा खर्च कापल्यानंतर त्याला फक्त ८.३६ रुपये मिळाले. या घटनेने हताश झालेल्या शेतकऱ्याने कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर टाकली, जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कांद्याच्या भावापेक्षा जास्त खर्च
मीडिया रिपोर्टस नुसार गदग जिल्ह्यातील पावडेप्पा हलिकेरी हे बंगळुरूमधील यशवंतपूर मंडईत कांदा विकण्यासाठी गेले होते, तेव्हा येथील घाऊक विक्रेत्याने 200 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केला. यानंतर घाऊक विक्रेत्याने शेतकऱ्याच्या नावे पावती तयार केली, ज्यामध्ये मालवाहतूक शुल्क 377 रुपये आणि कांदा उचल शुल्क 24 रुपये होते. या सर्वांचा खर्च वजा केल्यावर शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त 8 रुपये 36 पैसे आले. शेकडो किलोमीटरचा प्रवास करूनही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली. यानंतर, शेतकऱ्याने केवळ सोशल मीडियावर कांदा विक्रीची पावतीच शेअर केली नाही, तर इतर शेतकऱ्यांनाही कर्नाटकातील मंडईत कांदा विकण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले.
कांद्याचे भाव अपेक्षेपेक्षा जास्त घसरले
आपल्या घटनेचे वर्णन करताना पावडेप्पा हलिकेरी यांनी सांगितले की, पुणे आणि महाराष्ट्रातील शेतकरी देखील बंगळुरूच्या यशवंतपूर मंडईत आपला कांदा विक्रीसाठी येतात. या शेतकर्यांचे पीक चांगले आले तर त्यांना चांगला भाव मिळतो, पण अचानक कांद्याचे भाव इतके खाली येतील, असे कुणालाच वाटले नव्हते. गदग आणि उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल सावध करण्यासाठी आपण पावतीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचेही या शेतकऱ्याने सांगितले. कांद्याचे उत्पादन बाजारात नेण्यासाठी मी स्वतः 25,000 रुपये खर्च केले.
शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत
कर्नाटकातील अनेक भागात शेतकर्यांना हवामानाच्या अनियमिततेचा सामना करावा लागला, ज्यामुळे उत्पादन आणि शेतकर्यांचे थेट नुकसान झाले. गदग जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी झाली असून कांद्याचा आकारही लहान राहिल्याने शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळाला नाही. त्यावर शेतीचा आणि वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सध्या उत्तर कर्नाटकातील शेतकरी मजबुरीत आले असून त्यांनी सरकारला कांद्याची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू होण्याची परिस्थिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम