नाशिक – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवरील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ह्या मार्गांवर अपघाताच्या घटना वाढत असून काही महिन्यांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा ह्याच मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. तसेच, महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबत या खड्ड्यांमुळे महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न त्वरित मार्गी लावावे, अशी विनंती अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
काय लिहिले त्या पत्रात ?
अजित पवारांनी आपल्या पत्रात असे लिहिले आहे, की पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दररोज असह्य वाहतूक कोंडी होत आहे.
तसेच पावसाळ्यात महामार्गांवरील खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असून ह्यामुळे मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहेत. तसेच ह्या वाहतुक कोंडीमुळे प्रदुषणात भर पडत असून या महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.
त्यामुळे या महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढणे यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार व प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचीही विनंती अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम