नाशिक : राज्यात शेतकरी संकटात असताना मस्तवाल लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नाहीत. कांद्याचे भाव नको तेवढे पडले, खर्च अफाट वाढलेला असताना सरकारी धोरणाचा बळी कांदा उत्पादक शेतकरी पडला आहे, मात्र गेंड्याच्या कातडीचे सरकार अन् विरोधक झोपेचे सोंग घेवून बसले आहेत. सरकारने झोपेतून जागे व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुकारलेल्या कांदा विक्री बंद आंदोलनाला राज्यभरात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीत 100% बंद झाला तर काही ठिकाणी पन्नास टक्के पेक्षा आवक कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कांद्याचे बाजारभाव कोसळले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज हा लाक्षणिक बंद पुकारला होता मात्र भविष्यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिघोळे यांनी दिला. शेतकरी भयानक अशा संकटात सापडला असून निसर्गाची देखील साथ शेतकऱ्यांना नसल्याचे चित्र आहे. मजुरी, खते, औषधे, बियाणे आदींसाठी होणार खर्च वाढल्याने कांद्याचा सरासरी प्रति किलोग्रॅम उत्पादन खर्च १७ ते १८ रूपये येत आहे. सद्यस्थितीत कांद्याला सरासरी दहा ते बारा रुपये प्रति किलोग्रॅम भाव मिळत आहे. यामुळे नफा तर नाहीच. मात्र, उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यात खराब हवामानामुळे कांदा खराब होण्यास सुरवात झाली.
भाजपा सरकारच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय कांद्याची निर्यात चाळीस टक्क्यांवरून आठ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याला नेमकी जबाबदार कोण याचा देखील विचार होणे गरजेच आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थीक अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रति किलो आठ रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाकडे केली मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासाठी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष भारत दिघोळे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र संघटनेच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले. यामुळे आज संघटनेच्या वतीने कांदा विक्री बंद आंदोलन करण्यात आले होते या शेतकरी एकजुटीने किमान सरकारला जाग येईल इतकीच बळीराजा अपेक्षा करतोय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम