अबब; 25 फूट उंचीपर्यंत टोमॅटोची वाढ! मग चर्चा तर होणारच…!

0
17

महेश पगारे, अकोले
तालुक्यातील वीरगाव येथील अनेक प्रयोगशील शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग राबवत आहे. असाच एक प्रयोग टोमॅटो पिकात राबविला आहे. शेडनेटमध्ये टोमॅटोची लागवड केली असता तब्बल 25 फूटापर्यंत वाढ झाली आहे. यावर विश्‍वास बसणार नाही. परंतु, हे खरं असून, तीन सुशिक्षित तरुण शेतकरी बंधूंनी ही किमया साधली आहे.

वीरगाव येथील प्रयोगशील शेतकरी बंधू जगदीश, गणेश व उमेश हे तिघेही सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांनी आधुनिक शेतीची कास पकडली असून, ते शेतात सतत नवनवीन प्रयोग करत असतात. जानेवारी महिन्यात त्यांनी ‘याकामोज’ या देशी टोमॅटो वाणाची 20 गुंठे क्षेत्रावरील शेडनेटमध्ये 5 हजार रोपांची लागवड केली. यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पाणी, खत व औषध फवारणीमध्ये बचत होवून मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचला.

या वाणाची विशेषतः ही उंचीमध्ये आहे. तब्बल 40 फूटापर्यंत वाढ होणाऱ्या या वाणाची 25 फूटापर्यंत वाढ झाली. एका झाडाची 20 किलोपर्यंत उत्पादन क्षमता असून 250 ग्रॅमपर्यंत फळांचे वजन असते. त्यानुसारच परिपूर्ण पीक तयार करण्यात हे तिघे शेतकरी बंधू यशस्वी झाले. नुकतीच फळ काढणी झाली. प्रारंभी 150 रुपये 20 किलोसाठी तर नंतरच्या काळात 1200 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. अत्यंत आकर्षक टोमॅटो पीक क्षेत्र पाहण्यासाठी अनेक टोमॅटो उत्पादकांसह तज्ज्ञांनीही भेट देऊन शेतकरी बंधूंचे कौतुक केले.

वैशिष्ट्ये
एका हप्त्यात झाडाला दोन पाने व एक फूल गुच्छ येतो.

साधारण आठ महिने काढणी चालते.
अत्यंत आकर्षक व गोल आकाराची निर्यातक्षम फळे असतात. बाजारात इतर टोमॅटोच्या तुलनेत यास अधिकचा बाजारभाव मिळतो. लागवडीनंतर अत्यंत कमी खर्च येतो.

शेती आधुनिक पद्धतीने केल्यास नक्कीच यशस्वी होता येते. तरुण शेतकऱ्यांनी नेहमी वेगवेगळे प्रयोग करावेत. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला घ्यावा. आम्ही देखील अभ्यास करुनच हे टोमॅटो पीक काढण्यात यशस्वी झालो आहोत.
– गणेश तोरकड (टोमॅटो उत्पादक)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here