नाशिक : पाकिस्तानचा कांदा आखाती देशांमध्ये भारतीय कांद्याचा वांधा करायचा, असा अनुभव गेल्या तीन वर्षांपासून निर्यातदारांचा राहिला आहे. यंदा मात्र भारतीय कांद्याला टक्कर देणे पाकिस्तानमधील निर्यातदारांपुढे आव्हानात्मक परिस्थिती असेल.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून नवीन कांद्याची आवक पुढील महिन्यात सुरू होईल. पण तोपर्यंत भारतीय उन्हाळ कांद्याची चव आखाती देशातील ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळलेली असेल आणि भारतीय कांद्याच्या भावाशी पाकिस्तानमधील निर्यातदारांना स्पर्धा करणे कठीण झालेले असेल. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमधून सद्यःस्थितीत सरासरी एक हजार रुपये क्विंटल या भावाने उन्हाळ कांद्याची विक्री सुरू आहे. अशातच, मध्य प्रदेशातून नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, नाशिकच्या कांद्यापेक्षा एक ते दोन रुपये किलो, असा स्वस्त कांदा विकला जात आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान, बिहार, झारखंडमधील ग्राहकांसाठी मध्य प्रदेशाचा कांदा खरेदी केला जात आहे. मात्र, चवीसाठी म्हणून या राज्यातून नाशिकच्या उन्हाळ कांद्याला पसंती मिळत आहे. राजस्थानमधील कांदा संपला आहे.
कर्नाटकमधील नवीन कांद्याची आवक ऑगस्टमध्ये सुरू होईल. दरम्यान, पाकिस्तानमधील निर्यातदारांनी आखाती देशातील आयातदारांना नवीन कांद्याची आवक पंधरा दिवसांमध्ये सुरवात होईल, असे मेसेज पाठविण्यास सुरवात केली आहे. हे मेसेज एव्हाना भारतीय निर्यातदारांपर्यंत धडकले असून, त्यातील काही जणांनी आखाती देशातील स्पर्धेसाठी आम्ही तयार असल्याचे उत्तर आखाती देशातील आयातदारांना पाठविले आहेत.
नाफेडतर्फे १५० टन कांद्याची खरेदी
कांद्याचे यंदा अधिक उत्पादन अपेक्षित असताना भाव घसरत चालल्याने ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी सुरू करावी, अशी विनंती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सरकारकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले होते, असे श्री. घनवट यांनी सांगितले. केंद्र सरकारने दोन लाख २० हजार टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० हजार टन अधिक कांदा खरेदी करण्यात येणार आहे.
बाजारातील बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत ‘नाफेड’ने कांदा खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे श्री. घनवट यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगावमध्ये कांद्याची खरेदी सुरू झाली असून, आतापर्यंत १५० टन कांदा खरेदी केल्याची माहिती ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारचे जहाज कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने भाड्याचा प्रश्न सुटणे मुश्कील होऊन बसले आहे. जहाज कंपन्यांकडून भाडेवाढ होत असल्याने जागतिक बाजारपेठेतील नवनवीन ग्राहक शोधणे कठीण होते. शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन म्हणून कंटेनर भाड्यावर नियंत्रणाबाबत केंद्र सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. -विकास सिंह, निर्यातदार
कांदा निर्यातीचा भाव
(आकडे टनाला डॉलरमध्ये)
● सिंगापूर ३४०
• मलेशिया – ३१० ते ३२०
व्हिएतनाम- २८० ते २९०
• दुबई – ३४० ते ३५०
बांगलादेश – ३१० ते ३१५
बाजारपेठेतील आजचे बाजारभाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम