कृषी प्रतिनिधी : देशात शेतकरी पूर्णतः संकटात सापडला असून त्याचे कंबरडे मोडले आहे. शेतीमालाला भाव नाही मात्र खत खाद्याच्या किमती मात्र गगनाला भिडले आहेत. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या ५५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम सर्वच वस्तूंवर होत आहेत, तेलाच्या किमती वाढल्याने सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. आता शेतीवरही याचा परिणाम होत असून युद्धामुळे खतांच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देशात ७ जूननंतर शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या युद्धाची झळ महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचलेली असताना खतांच्या दरवाढीतून ती आता शेताच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे. या वाढीव किमतीच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी मात्र धसका घेतला आहे, त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेला शेतकरी आता बियांच्या व खतांच्या वाढत्या किंमतीमुळे आणखीनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. खत खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची बाजारपेठेमध्ये उलाढाल होते. त्याप्रमाणे या वर्षीही होणार आहे. यात व्यापारी सुखी तर शेतकरी उपासी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असलेल्या पोटॅशची आयात भारतात रशियाकडून केली जाते. मात्र, सध्या रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियासह अन्य देशांकडून होणारा पोटॅश व फॉस्फरसच्या कच्च्या मालाचा पुरवठा काही प्रमाणात अल्प झाला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम खतांच्या किमतीवर होऊन त्यातून खतांच्या किंमतीमध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास शेती करणे मात्र कठीण होणार आहे.
रासायनिक खतांच्या किमतीमध्ये सुमारे चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास या युद्धाची झळ शेताच्या बांधापर्यंत पोहोचणार असून शेतकऱ्याला खत दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. यावर केंद्राने कठोर पावले उचलावीत असे आवानही करण्यात येत आहे.
रशिया हा भारताला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची निर्यात करतो. मात्र, रशिया युक्रेनच्या युद्धात युक्रेनची जास्त हानी झाली तरी रशियाची काही प्रमाणात का होईना हानी झाली आहे. त्यामुळे रशियावरही याचा परिणाम होणार असून, याचा सर्वात मोठा परिणाम खतांच्या व्यवसायावर होणार आहे. हे युद्ध असेच चालू राहिल्यास भविष्यात खतांच्या किमतीही दुपटीने वाढणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात खतांच्या किमतीविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खतांच्या किंमती वाढल्या तर याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच महागाईमुळे जनता त्रस्त असून आता त्यात युद्धाची भर पडल्याने आणखीनच शेतकरी होरपळण्याची शक्यता आहे.
रासायनिक खतांची मर्यादित उपलब्धता राहिल्यास आणि दरवाढ झाल्यास खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर या युद्धाचे कारण देऊन मोठ्या प्रमाणात खतांचा काळाबाजार होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे..
तेलासह अन्य विविध वस्तूंचे वाढलेले दर आणि त्यातून झालेल्या महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेती करणे मुश्कील झाले आहे. अशा स्थितीत खतांच्या दरांमध्येही वाढ झाली तर शेती करणे अधिकच अवघड होऊन जाईल. – मोहसीन तांबोळी अध्यक्ष, प्रहार संघटना दक्षिण सोलापूर तालुका.
शेती करणे कठीण
भारत हा कृषिप्रधान देश असून, आता नावाला कृषी प्रधान उरतो की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे. भारतात मुख्य व्यवसाय हा शेती आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे जर खतांच्या किमतीवर परिणाम होणार असेल तर भारतातील शेती व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. परिणामी, याची झळ सर्वांनाच बसण्याची दाट शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम