शेतकऱ्यांनी आता बंदुका घेऊन तालिबानी नक्षलवादी बनायचे काय ?

0
16

नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाने तेथे बंदी असलेल्या बैलगाडी शर्यती सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा गेली ७/८वर्षे बंद असलेल्या बैलगाडी शर्यती सुरू होण्याची आशा राज्यातील शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने बैठक घेऊन महिनाभरात यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. ७ मे २०१४ ला सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अन्यायकारक बंदीचा विषय गेली सात साडेसात वर्षे राज्यात गाजतोय,चुकीच्या अभ्यास आणि कायद्यावर आधारीत ही बंदी उठवण्यासाठी बैलगाडी शौकीन, शेतकरी, बैलगाडी मालक,काही लोकप्रतिनिधी आणि समस्त बैलप्रेमी यांच्या पातळीवर आंदोलन, मागण्या,रास्तारोको, मोर्चे,अशा अनेक प्रकारे जीव तोडून प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र अद्याप या शर्यती सुरू होऊ शकल्या नाहीत.

हस्तिदंती,एअर कंडिशन मनोऱ्यात बसून तळागाळातील एखाद्या परंपरा, चालीरीती ची संस्कृती ची माहिती अभ्यास नसताना जर निर्णय अथवा निकाल दिले गेले तर कसे अन्यायकारक ठरतात याचे ही बंदी म्हणजे ज्वलंत उदाहरण ठरावे तसेच उंटावरून शेळ्या हाकण्याचाच हा संतापजनक प्रकार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने पर्यावरण आणि वन मंत्रालयाने ११ जुलै२०११ रोजी बैल या पाळीव प्राण्याचा समावेश सरकारी राजपत्रात केला आहे, त्यामुळे बैलांचे प्रदर्शन वंशर्यती बंद झाल्या, हा विषय पशुसंवर्धन मंत्रालयाकडे हस्तांतरित झाला,सबब हा गुंता सोडवण्यासाठी मंत्रालयाने बैलांचा समावेश या गॅझेट मधून काढणे आवश्यक आहे.

याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर ७ मे २०१४ पासून बंदी घातली आहे, यात पेटा या प्राणिहक्क संघटनेचाही सहभाग आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या प्राचीन, सांस्कृतिक कृषी संस्कृती चा वैभव असणारा बैल हा पाळीव प्राणी संपूर्ण राज्याला आणि शेतकऱ्यांना आपल्या प्राणांहून प्रिय आणि पूजनीय आहे,तर राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी बैल गाडी शर्यतींची परंपरा कित्येक वर्षे जुनी आहे.ग्रामीण भागात देव देवतांच्या यात्रा,जत्रा मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजन ची परंपरा आहे यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते,याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास होतो, त्याचबरोबर गोवंशसंवर्धन शेतकऱ्यांना शेतीसाठी, शर्यतीसाठी विविध जातीचे वंशाचे बैल उपलब्ध होतात,यात प्रामुख्याने खिल्लार जातीचा समावेश आहे. शर्यती मुळे बैलांचे भाव वधारतात यामुळे गावोगावी गोवंश वाढतो,शेतकरी मग मोठया प्रमाणावर गाय बैल यांची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी प्रवृत्त होतात,गोवंश वाढल्याने शेतीसाठी नैसर्गिक खत मोठया प्रमाणावर उपलब्ध होते,परिणामी बैलांच्या मशागतीने आणि शेणखत वापराने शेती उत्पन्न कित्येक पटीने वाढते.

आज यांत्रिक शेतीचे युग असले तरी निववळ बैलगाडी शर्तीच्या छंदांमूळे नष्ट होत चाललेला गोवंश टिकण्याचे महत्त्वाचे काम होत आहे. असे असताना या अन्यायकारक बंदीने गेल्या सात वर्षात गोवंश वाचवण्याच्या शेतकरी प्रयत्नापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे त्यामुळे बैल,गाय आणि एकूणच गोवंश आणि शेतीच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकरी अगोदरच विविध अस्मानी, सुलतानी संकटांमुळे त्रस्त आहे शेतमालाला हमीभाव नाही,फळे भाजीपाला, कांदा, टोमॅटो अशा सर्व प्रकारच्या शेतमालाची अक्षरशः कवडीमोल भावाने विक्री करण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर येते आहे शेतमाल फेकून देण्याची किंवा फुकट वाटण्याची नामुष्की त्याच्यावर येत आहे,प्रचंड महागाईने शेतीचा भांडवली खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे त्या तुलनेत मालाला दर मिळत नाही,बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांची वाईट अवस्था होत आहे, यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत,मात्र हे दुष्टचक्र भेदून शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येण्यासाठी आजपावेतो कुठलेच सरकार कायमस्वरूपी ठोस तोडगा काढू शकलेले नाही.

अलीकडे उद्धेगा ने अनेक शेतकरी आपल्या शेतात गांजासार खे अमली पदार्थ लागवडीची परवानगी सरकारकडे मागू लागले आहेत यावरून शेतकऱ्यांच्या दैन्यवस्थेची कल्पना येते
अशातच शर्यती वरील बंदी कशी शेतकऱ्यांच्या मुळावरच उठली आहे याचा आज गंभीरपणे सरकारसहीत सर्वांनी विचार केला पाहिजे.
प्राणिहक्क संघटना आणि कोर्टाने शर्यत बंदीऐवजी जरा डोळे उघडून बघितले तर गोवंशाच्या नरकयातना त्यांना राज्यात शहरे, गावे सगळीकडे दिसून येतील, बैल,गायीची सरसहा क्रूर,नृशंस पणे कत्तल करणारे कत्तलखाने यांना दिसत नाहीत काय ? मूक पाळीव प्राण्यांची कत्तल करणारे कसाब याना दिसत नाहीत काय ? दुसरीकडे यांत्रिक युग असताना वाहनांची कमतरता नसताना साखर कारखानदारी त ऊस वाहतूक करताना बैलगाड्याचा वापर करण्यात येतो, सदर ऊस वाहतुकीच्या निर्दयी, रानटी प्रकारात गरीब पाळीव वयस्कर बैलांचे क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने कसे जीवावर बेतण्यासारखे हाल होत असतात.

त्यांना नरकयातना भोगाव्या लागतात ते बघून कुठल्याही संवेदनशील माणसाला हे सहन होऊ शकत नाही मग मुक्या प्राण्याचे हे हाल प्राणिहक्क संघटना अथवा कोर्टाला दिसत नाहीत काय ? यावर कोण बंदी घालणार ? शर्यती च्या बैलांची आणि शेतीच्या बैलांची जातिवंत शेतकरी पोटच्या पोरापेक्षा जास्त काळजी घेतो हे वास्तव यांना माहीत आहे काय ? प्राणिहक्क संघटना जरूर चालवा मात्र बैलगाडी शर्यत बंदी हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार आहे.

बैल अथवा इतर प्राणी यांच्यावर खरोखरच होत असलेला अन्याय छळ या लोकांनी जरा उघड्या डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे पुणे नगर बारामती या भागात शर्यती साठी गाडे वापरले जातात, तर कोल्हापूर साईडला बैलगाडी ६/७ किलोमीटर पळवल्या जातात सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यातील बहुतेक भागात फायनल पध्दतीच्या शर्यती आयोजित करण्यात येतात,यात गट,सेमी फायनल आणि शेवटी फायनल अशी पद्धत वापरली जाते, तात्पर्य पद्धत कुठलीही असो या शर्यती प्रेक्षणीय असतात

गेल्या सात वर्षात बंदी झुगारून अनेक ठिकाणी शर्यती घेण्याचा शेतकरी यांनी प्रयत्न केला मात्र हे प्रयत्न पोलीस कारवाईने हाणून पाडण्यात आले,त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, बैलगाडी मालक,शौकीन, यांनी अनेक मंत्री,लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली,आंदोलन केली मात्र ही बंदी अद्याप उठू शकली नाही.
तुर्ताच एका आमदाराने शर्यती आयोजित करून या बंदीला सरकारला आव्हान दिले परिणामी हा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर आला आहे, कर्नाटक, तमिळ नाडू या राज्यांनी शर्यती साठी स्वतंत्र कायदा लागू केला आहे, महाराष्ट्रत ही कायदा २०१७ ला करण्यात आला आहे मात्र त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्याने बंदी कायम आहे.

मात्र आता राज्यातील शेतकरी बैलगाडी मालक,शौकीन, यांचा संयम सुटत चालला आहे, तेंव्हा दोन्ही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने व लोकप्रतिनिधी यांनी टोलवाटोलवी न करता ताबडतोब हा प्रश्न सोडवण्यासाठी गंभीरपणे हालचाली करून हा मुद्दा निकालात काढावा अन्यथा अगोदरच शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे,मराठा समाजाच्या आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा कोर्टकचेरी आणि राजकारणाच्या दलदलीत रुतला आहे त्यातच हा शर्यत बंदीचा प्रश्न संवेदनशील आणि स्फोटक बनत चालला आहे,परिणामी संयम सुटत चाललेला शेतकरी, तरुण,बैलगाडी मालक,शौकीन यांच्याकडून आम्ही आता बंदुका हातात घेऊन तालिबानी, नक्षलवादी बनावे अशी सरकारांची अपेक्षा आहे काय ?असा संतप्त सवाल विचारला जाईल

– शिवाजी पाटील
दि ४ सप्टेंबर २०२१


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here