देवळा प्रतिनिधी : तालुक्यात सद्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा लागवड सुरू असून ,विजेच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कांदा लागवड करावी लागत आहे . एकीकडे लागवडीसाठी मजुर मिळत नाही त्यात भारनियमन यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला असून ,शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन कमीत कमी पीक लागवडीच्या सीजनमध्ये तरी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा ,अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केली आहे.
देवळा तालुक्यात सर्वत्र कांदा लागवडीसाठी लगबग सुरू आहे. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कांदा रोप खराब झाले आहे . यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, आता लागवड योग्य रोपावर दव पडत असल्याने शेतकरी वर्ग अधिक चिंताक्रांत बनला आहे . त्यात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने लागवडीवर याचा परिणाम दिसून येत आहे .कांदा लागवडीसाठी मिळेल तिथून मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांना आपली कसरत करावी लागत असून,त्यात विजेच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त आहे . बहुतांश ठिकाणी शेतकरी रात्रीच्या वेळेत कांदा लागवड करतांना दिसत असून, येन थंडीच्या दिवसात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे .
शासनाने याची दखल घेऊन भारनियमनच्या वेळेत बदल करून दिवसा वीजपुरवठा करावा ,अन्यथा संतप्त शेतकरी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडतील , असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे .
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे . यामुळे शेतकऱ्यांना रात्री कांदा लागवड करावी लागत आहे . त्यात मजूर मिळत नाही . अशा दुहेरी तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा .
– शिवाजी पवार , शेतकरी वाखारी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम