देवळा प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात आज अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे कांदा लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचा तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे .
देवळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अभ्राछदित वातावरण निर्माण झाले असून बुधवारी( दि १) रोजी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू झाल्याने यात कांदा ,द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे टाकून कांदा लागवड केली असून, अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याने हतबल झाला आहे . बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम होत असून,महागडी औषधी खरेदी करून फवारणी करावी लागत आहे . त्यात अवकाळी पावसाचा फटका बसत असल्याने शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला. कांद्याला भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. मात्र ,कांद्याच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली घसरण यामुळे शेतकरी वर्ग मोटाकुटीस आला आहे . खर्चही वसूल होत नसल्याने त्यात वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे .
शेती पिकांवर येत असलेल्या संकटावर सामना करतांना जिकरीचे होऊन बसले असून, आजच्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळेल असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून ,नुकसानभरपाई द्यावी ,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
दरम्यान , बुधवारी दिवसभर सुरु असलेल्या पाऊसामुळे देवळा बाजार समिती मध्ये विक्री साठी आलेल्या कांद्याचा लिलाव न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपली वाहने माघारी घेतली . पाऊस सुरु असल्याने दिवसभर शेतकऱ्यांना मार्केट यार्डात उपाशी पोटी ताटकळत राहावे लागले . पाऊस उघडल्यावर कांदा लिलाव सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सचिव माणिक निकम यांनी दिली.
बदलत्या हवामानाचा पिकांवर विपरीत परिणाम दिसून येत असून , त्यात अवकाळी पावसामुळे कांदा ,द्राक्ष आदी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे . शेतकर्यांनीं आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकांकडून मार्गदर्शन तसेच नुकसान झालेल्या पिकांबाबत माहिती द्यावी .- सचिन देवरे – तालुका कृषी अधिकारी ,देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम