द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसवण्याकरिता अनुदान देण्यात येते. सन २०१७च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा या योजनेत समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करून ही योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबवण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे.
राज्यात आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता ५८९ कोटी रुपये रकमेस शासनाची प्रशासकीय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबवणार असून, अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम