स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कांद्याने सुरवातीलाच रडकुंडीला आणले आहे. कांदा लागवडीसाठी भेटत नसलेल्या मजुरांच्या टंचाईने शेतकरी संकटात सापडला आहे. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) हा कांद्याचे उत्पादन घेण्यात अग्रेसर व आगार म्हणून ओळखला जातो.
या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे पुर्णपणे कांदा पिकावरच अवलंबून असते.
या भागातील शेतकरी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. चालू वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पाण्याची भुजल पातळी चांगल्या प्रकारे राहिली असुन यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने उन्हाळी कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यातच सगळीकडे एकाच वेळी कांदा लागवड व पावसाळी कांद्याची काढणी सुरू झाली असल्याने फार मोठी मजुर टंचाई निर्माण झाली आहे.
लागवडीसाठी आवश्यक मजुर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदळ व चिंता निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत मजुर पुरवठा होत नसल्याने मजुरीचा दर वधारला आहे. या अडवणुकीच्या धोरणामुळे गावागावात मनमानी वाढत चालली आहे. मजुर पळापळवीच्या स्पर्धेत वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. मजुरांच्या टोळ्यांचा शोध घेऊन दर निश्चित करतांनाही मोठ्या अडथळ्यांना पार करावे लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. वाफे पद्धतीसाठी आठ ते नऊ हजार तर बेले पद्धतीसाठी नऊ ते दहा हजार प्रति एकरासाठी मजुरीचे दर घेतले जात आहेत. एवढे करुनही वेळेवर मजुर उपलब्ध होतीलच याची शाश्वती नसते मजुरांना शेतात आणण्यासाठी ट्रक्टर, पिकअप, रिक्षा, आदी वाहणे वापरली जात आहेत.
शेतकऱ्यांना मजुरी व्यतीरीक्त हा खर्च पेलावा लागत आहे. बऱ्याच गावांनी आपल्या गावचे मजूर बाहेरगावी जाऊ नये म्हणून त्यांचेवर जाचक अटी घालून निर्बंध आणलेत खरे पण त्याचेही दुष्परिणाम लगेच समोर यायला लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. मजूर एवढे कमी झालेत की अक्षरशः त्यांचेकडे आगाऊ रक्कम देऊनही त्यांची उपलब्धता होत नाही. आणि त्यातूनच वीज वितरण कंपनीचे एवढे फावले आहे की, त्यांनी दिवसा वीज देणेच बंद केले. अगदी दिवसभर मजुरांच्या पाया पडून कांद्याची लागण करावी नाही तेव्हा जर दुसऱ्या दिवशी मजूर उपलब्ध होणार नसतील तर त्यांना नाश्ता पाणी देऊन तेही मजुरी व्यतिरिक्त उशिरा पर्यंत लागण करावी लागते आणि रात्री उशिरा लाईट आल्यावर त्यांना पाणी भरण्यासाठी जावे म्हणजे यात बिचाऱ्या शेतकऱ्याची अगदी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने व कांद्याची रोपे तयार झाली असुन लावण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांची वाट पाहण्यापेक्षा आपल्या घरातील व्यक्ती व शेजारील व्यक्ती अशा पद्धतीने जमवाजमव करून आडजी पडजीने कांदा लागवड करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम