सोनाली भवर
द पॉईंट नाऊ ब्युरो ; राज्यात सर्वत्र थंडीची चाहूल सुरू झालेली असतानाच पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे, कांदे, द्राक्ष, कापूस या सर्वच पिकांना पावसाने भुईसपाट केले आहे, वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात शेतकऱ्यांचे अश्रू देखील वाहत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ऐन हिवाळ्यात पावसानं हजेरी लावल्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना ह्या पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील ५ दिवस महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रात मासेमारीला जाऊ नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक,पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे जिल्ह्यांना १ व २ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील बीड, लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांनादेखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम