फेसबुकवर ओळख, प्रेम अन लग्न ; मात्र 3 महिन्यातच मोडला ‘संसार’

0
23

फेसबुकवर झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर, प्रेम विवाह आणि अवघ्या तिनच महिन्यात घटस्फोटाची मागणी अशा विचित्र घटनेने अकोले तालुक्यातील गणोरे सध्या चर्चेत आहे.

अकोले प्रतिनिधी: अहमदनगरमधील तरुणीसोबत गेल्या वर्षी फेसबुकवर ओळख झाली त्यातून दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. मात्र जातीव्यवस्थेच्या जोखडात ते तीन महिन्यांहून अधिककाळ टिकू शकले नाही. त्याची परिणती घटस्फोट मागण्यात झाली. त्यासाठी विवाहितेवर दबाव निर्माण करण्यात आला, तिला दमबाजी, शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली आणि अखेर या प्रकरणाचा शेवट पतीसह सासू-सासरे आणि दोघा दिरांवर हुंड्यासाठी छळ केल्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्यात झाला. या घटनेने संपूर्ण अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणोरे येथील विशाल शंकर आहेर या तरुणाची फेसबुक या समाजमाध्यवर अहमदनगरमध्ये राहणार्‍या एका तरुणीशी ओळख झाली. काही कालावधीपर्यंत दोघांमध्ये फेसबुकवर संवाद झाल्यानंतर त्यांच्यात एकमेकांप्रती आकर्षण निर्माण होवून त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे ते दोघेही अहमदनगर येथील तरुणीच्या घरी किंवा मुंबई येथे तरुणीच्या आई-वडिलांच्या घरी एकमेकांना भेटू लागले. गेल्या 20 मे, 2021 रोजी या दोघांनीही ओळखीच्या 10/15 जणांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील एका मंदिरात हिंदु पद्धतीने विवाह करुन आपल्या नवजीवनाची सुरुवात केली.

लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी दोघेही मुलाच्या मूळगावी गणोरे (ता.अकोले) येथे आले. आठ दिवस सासरवाडीचे सुख भोगल्यानंतर हे जोडपे पुन्हा नगरला गेले आणि तेथेच आठ दिवस राहिले. त्यानंतर विशाल याने शेतीचे काम असल्याचे सांगून गणोरे गाठले. या कालावधीत विवाहित तरुणी अहमदनगर येथेच होती. या दरम्यानच्या काळात विशाल अधुनमधून नगरला जात व ते दोघे सोबत राहत. चालू महिन्यात 3 ऑगस्ट रोजी त्या दोघांनीही अहमदनगर महापालिकेत जावून विवाह नोंदणी केली आणि दुसर्‍याच दिवशी (ता.4) दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचा राग येवून विशाल तेथून निघून थेट आपल्या गावी गणोरे येथे आला. आपला पती असा अचानक का निघून गेला या काळजीपोटी त्या तरुणीनेही त्याच्या पाठोपाठ गणोरे गाठले.

गणोरे येथे आल्यानंतर तिचा पती विशाल, सासरा शंकर, सासू हिराबाई, दिर दिनेश व भाया सागर यांच्यात चर्चा सुरु असतानाच सदरची तरुणी मागासवर्गीय असल्याची गोष्ट त्यांना समजली. त्यावरुन तिच्या सासर्‍यांनी तिला शिवीगाळ करीत तुझ्यामुळे माझ्या इतर मुला-मुलींची लग्ने होणार नाहीत, त्यामुळे आम्ही तुला घरात घेणार नाही. तु निघून जा वगैरे म्हणत चौघांनी तिला मारहाण करीत घराबाहेर काढून दिले. त्यानंतर सदरची विवाहिता आपल्या पतीसह पुन्हा अहमदनगर येथे आली. यावेळी विशालनेही आपले दुसर्‍या एका मुलीवर प्रेम असून ती आमच्या जातीची असल्याने मला तिच्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. त्यावर मी घटस्फोट देणार नाही अशी तिने भूमिका घेतल्याने अखेर आपण मुंबईला जावून सोबत राहू म्हणत विशाल तिला मुंबईला घेवून गेला.

7 ऑगस्ट रोजी ते दोघेही अहमदनगर येथून मुंबईला गेले. तेथे गेल्यावर त्या तरुणीने आपल्या आईकडून 1 लाख रुपये घेतले व गोरेगावला जाण्यासाठी ते दादर रेल्वेस्थानकावर आले. तेथे गेल्यावर सामान, घराची कागदपत्रे व पैशांची बॅग पती विशालकडे सोपवून ती विवाहिता तिकिटे काढण्यासाठी गेली असता विशाल त्याच्याकडे सोपविलेले सगळे सामान घेवून तेथून पसार झाला. तिकिटे घेवून परत आल्यानंतर तिने त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो आढळला नाही. त्याला त्याच्या मोबाईलवर फोनही केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रात्री उशीराने सदरची तरुणी मुंबईहून थेट अकोले पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे आल्यावर तिला समजले की आपला पती हरवल्याबाबत त्याच्या वडिलांनी 5 ऑगस्ट रोजीच फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावर तिने आपल्यावरील घडला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यावर तुम्हांला तक्रार द्यायची असल्यास तुम्ही देवून टाका असे उत्तर पोलिसांनी दिले.

त्यानंतर सदर तरुणी तक्रार दाखल न करताच पुन्हा अहमदनगरला गेली. तेथे नातेवाईकांशी सल्लामसलत केल्यानंतर तिने पुन्हा अकोल्यात येवून वरील पाच जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार आपण मागासवर्गीय असल्याचे माहिती असूनही विशाल शंकर आहेर (रा.गणोरे) याने 20 मे, 2021 रोजी आपल्याशी विवाह केला. त्यानंतर काही दिवस नांदवून गणोरे येथे गेले असता आपल्या जातीवरुन बोलत, शिवीगाळ व मारहाण करीत सासरच्या मंडळींनी आपल्याला घराबाहेर काढले. पतीने मुंबईत नेवून आपल्याला तेथेच सोडून देत आपले सगळे सामान, रोकड व कागदपत्रे घेवून पलायन करीत आपली फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यावरुन अकोले पोलिसांनी विवाहितेचा पती विशाल, सासरा शंकर, सासू हिराबाई, दिर दिनेश व भाया सागर शंकर आहेर अशा पाच जणांवर भारतीय दंड संहितेचे कलम 323, 420, 498 (अ), 504, 506, 34 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 (1) (आर), (एस), 3 (2), (व्ही), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यावृत्ताने गणोरेसह संपूर्ण अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here