द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पूर्वी म्हटलं जायचं ”शेतकरी ऋणात जन्मतो, व्याजात वाढतो अन थकबाकीत आपलं जीवन संपवत असतो” याचा प्रत्ये आज पुन्हा आला आहे. बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील तरुण शेतकरी प्रकाश केशवराव ठाकरे (वय ४५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शेतकऱ्यांच्या सणाच्या दिवशी घडल्याने हळहळ व्यक्त केली जातेय.
आज ठाकरे नामक शेतकऱ्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे पाच एकर शेतजमीन होती. ठाकरे यांनी श्रीपूरवडे सोसायटीकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. भाव वाढेल या आशेवर कांद्याची साठवण देखील त्यांनी केली होती. परंतु, आर्थिक गणित कोलमडल्याने तणावात असलेल्या ठाकरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.
आज ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. झालेल्या घटनेची बागलाण तहसीलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, जायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील ही आज दुसरी घटना आहे. राजपुरपांडे येथील नुकतीच झालेल्या शेतकरी आत्महत्येनंतर श्रीपूरवडे येथील घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम