द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Parliament Winter Session) विविध मुद्यांवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला घेरले जात आहे. पण भाजपचे (BJP) अनेक खासदार गैरहजर राहत असल्याचे समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना ठणकावलं आहे. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी या खासदारांना थेट इशारा दिला आहे.
मागील अधिवेशनामध्येही भाजपचे खासदार संसदेत गैरहजर राहत असल्याचे समोर आले होते. त्यावेळीही पक्षाच्या बैठकीत मोदींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पण त्यानंतरही सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशानदरम्यानही हेच पाहायला मिळत आहे. आज झालेल्या भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. यावेळीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत सर्व खासदारांनी उपस्थित राहायला हवे. संसदेत कोणतंही विधेयक असो वा नसो, खासदारांनी नियमितपणे उपस्थित राहायला हवं. तुम्ही स्वत:ला बदललं नाही, तर पुढील काळात बदल होतील. हे बदल आपोआप होती. त्यामुळे संसदेत आणि बैठकांना नियमितपणे उपस्थित रहा. लहान मुलांसारखे सतत सांगायला लागणे चांगले नाही, अशा कडक शब्दांत पंतप्रधानांनी खासदारांना इशारा दिल्याचे समजते.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारवा विविध मुद्यांवरून धारेवर धरले आहे. कृषी कायदे, हमीभाव, नागालँडमध्ये नागरिकांची झालेली हत्या, बारा खासदारांचे निलंबन, कोरोना आदी मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना सूचक इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम