द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतीत कांदा लागवड सुरू झाली असून मजूर लागवडीसाठी मिळत नाही, त्यात कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतपंपाना दिवसा लाईट नाही. 3 दिवस दिवसा तर इतर दिवस रात्री – बेरात्री लाईट असल्याने देवळा तालुक्यात शेतकऱ्यांनी रात्रीची कांदे लागवड सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो व कर्जातच मरतो’ हे आपण वाचत आलो. अलीकडच्या दोन-तीन दशकांत, विशेषतः महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व मूलतः नापिकीमुळे आत्महत्या केल्या हे कटू वास्तव आपण स्वीकारले आहे. या सर्व वास्तवाबद्दल कोणत्याच राजकीय नेत्यांना, पक्षीय राजकारणाचे एक साधन, या पलीकडे काहीच वाटत नाही म्हणून दिवसेंदिवस शेतकरी देशोधडीला लागला आहे.
नाकर्ते सरकारच्या धरसोड वृत्तीने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय तर, जीव मुठीत धरून रात्रीच्या काळोखात कांदे लागवड करावी लागतेय, हे कृषिप्रधान देशात फारच दुर्दैवी आहे. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती आहे तर बाकी जिल्ह्यात काय असेल हा विचार न केलेलाच बरा.
देवळा तालुक्यातील रामेश्वर गावात नंदकुमार पगार व भैय्या पगार यांच्या शेतात रात्रीची कांदा लागवड करण्यात येत आहे, दिवसा मजूर भेटत नाही, तसेच कांद्याना पाणी देण्यासाठी वीज नाही अशा परिस्थितीवर मात करत रात्रीच्या काळोखात संसाराचा गाडा हाकला जातोय.
या जीवघेण्या परिस्थितीकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जगाचा पोशिंदा अंधारात असेल तर देशाचे भविष्य देखील अंधारात जाईल याकडे लक्ष द्यावी ही मागणी होतेय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम