कृषी प्रतिनिधी : राज्यात कांद्याचे घसरलेले दर बघता शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. काही दिवसांपासून कांद्याचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत, उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येत असल्यामूळे कांद्याचे दर प्रचंड घसरलेले आहे.
कांदा प्रति क्विंटल हजार रुपयांच्या वर दर मिळत नसल्याने शेतकर्यांनी कांद्याला लावलेला खर्च तर दूरच पण काढणीसाठी व वाहतुकीसाठी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामूळे बर्याच शेतकर्यांनी कांदा न काढता शेतात तसाच पडू दिला आहे. कांद्याची विक्री करून मिळालेल्या पैशातून मजुरांना पैसे देता येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी तर आपल्या उभ्या पिकाला आग लावली आहे.
दोन दिवसांपूर्वी कांद्याने तर हद्दच पार केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण बाजार समितीत 100 रुपये प्रति क्विंटलने कांदा विकला गेला. पैठण बाजार समितीत 1 रुपया किलो कांदा विकला गेल्याने शेतकर्यांचा आता कांद्या वरील विश्वासच उडाला आहे. असं असलं तरी आता कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. कांद्याच्या दरात आता वाढ होणार म्हणजे होणार असं तज्ञांकडून बोललं जात आहे.
कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून उदयास आलेल्या लासलगाव बाजार समितीत आता नाफेडकडून कांद्याच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या दराच्या तुलनेत नाफेडकडून चांगला दर मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहे.
नाफेडकडून खरेदी सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरांमध्ये 200 रुपयांनी वाढ झाली. थोड्याच दिवसात व्यापारी आणि नाफेड यांच्यात दरांबाबत स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास बाजार भाव वाढतील असं तज्ञांचं मत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांच्या डोळ्यातील पाणी आता थांबवणार असल्याचं चित्र दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम