कल्याण:
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ग्रामीण भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने कमालीचे हाल होत असून या भागासाठी पाणीसाठा वाढवून देण्याची मागणी होत आहे. मात्र एमआयडीसीची पाणी उदंचन क्षमता संपलेली असल्याने वाढीव पाणी देण्यासाठी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळेच केडीएमसीने नेतिवली शुद्धीकरण केंद्रातून पिसवली, नेतिवली आणि लगतच्या भागासाठी १० एमएलडी पाणी दिले, तर ते ग्रामीण भागासाठी वळवता येईल, असा प्रस्ताव एमआयडीसीने पालिका प्रशासनाला दिला आहे. मात्र केडीएमसीकडूनही उदंचन क्षमता नसल्याचे कारण दिले जात असल्याने, या वादात नागरिकांच्या घशाची कोरड मात्र कायम आहे.
ग्रामीण भागासाठी एमआयडीसीकडून ८३ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. मात्र २७ गावांचा वाढता पसारा, वेगाने वाढणारी अनधिकृत बांधकामे यांमुळे या गावांतील अनेक भागांत पिण्यासाठी पाणीच पोहोचत नसल्याची तक्रार आहे. ज्या भागात पाणी येते, तिथेही दिवसातील काही मिनिटे अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बारवी धरणात आजमितीला ३१ टक्के पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात थोडा फार पाऊस पडत असल्याने धरणात पुरेसे पाणी असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. यामुळे कोणतीही पाणीकपात करण्यात आलेली नाही. मात्र तरीही ग्रामीण भागातील जनता मात्र पाण्यासाठी मोर्चे, आंदोलने करत निवेदने देत आहे.
दरम्यान, दररोज ८९५ एमएलडी पाण्याची उचल करणारी एमआयडीसी या पाण्याचे वितरण अतिशय कसरतीने करत आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाने एमआयडीसीला १०५ एमएलडी कोटा वाढवून दिला असला, तरी या पाण्याची उचल करण्यासाठीची यंत्रणा एमआयडीसीकडे नाही. ही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळेच ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसीने पिसवली, नेतिवली भागातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, तेच १० एमएलडी पाणी ग्रामीण भागात फिरवले जाईल, नागरिकांची १५ एमएलडीची मागणी असली तरी यामुळे किमान १० एमएलडी पाणी दररोज मिळेल, असा प्रस्ताव एमआयडीसीने पालिका प्रशासनाला दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम