नाशिक प्रतिनिधी : सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती तसेच शहरी भागात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत.
काही ठिकाणी अल्प पाऊस असून धरणसाठा देखील कमी आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असून, जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
भुजबळ आज नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी तसेच कष्टकऱ्यांच्या सोबत असून सरकार खंबीर आहे. असा निर्वाळा भुजबळांनी दिला.
या दौऱ्या वेळी आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, सोपान कासार, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, दिपक पाटील यांच्यासह दोनही तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात एकच पॅटर्न राबविण्यात येईल, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येत असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करुन त्यांना न्याय देण्याचे काम होईल असा विश्वास व्यक्त करतांना मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महसूल, कृषी, आरोग्य व नगरपरिषदेने पूर्ण ताकदीने काम करुन बाधितांच्या पुर्नवसनाचे काम तातडीने करावे.
शेत शिवारासह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाप्रती संवेदनशील राहून प्रशासनातील प्रत्येक घटकाने त्याला न्याय देण्याबरोबर त्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी यथोचित रित्या पार पाडावी. झालेल्या नुकसानीचे पंचनामे व तातडीच्या मदतीसह नुकसान झालेल्या बंधारे व रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, शहरातील गाळ व चिखलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी शहराची साफसफाई तातडीने करण्यात यावी. यासाठी फायर ब्रिगेडची लागणारी यंत्रणा तातडीने मागवून शहरातील सर्व चिखल साफ करण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरूस्तीचे कामे तातडीने हाती घ्यावी, तर खंडीत झालेला विज पुरवठा विज वितरण कंपनीने तात्काळ सुरळीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शिवभोजन थाळीच्या मर्यादेत वाढ
नांदगाव तालुक्यातील आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळीच्या मर्यादा 150 वरुन 300 करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिले. तर नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना करण्याबाबतही त्यांनी सुचना केल्या.
यावेळी आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून आपत्कालीन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. तर जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी आहेर यांनी जिल्हा परिषदेच्या 2702 अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
नुकसानग्रस्त भागांची केली पहाणी
यावेळी सर्वप्रथम मालेगाव तालुक्यातील जाटपाडे व नांदगांव तालुक्यातील साकोरा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम