देवळा : महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी बाबत राज्य सरकारने निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तर याच विषयावर बागलाण तालुक्यातील मोरे नगर येथील व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे आमच्या कांद्यापासून वाईन बनवा हा संदेश देणारे व्यंगचित्र मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत असून, कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडणारे हे बोलके व्यंगचित्र सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
किराणा सामानाचे दुकान अशा सुपर मार्केटसारख्या ठिकाणी वाईन विकण्याच्या धोरणाला अनुमती दिल्याने वाईन विक्रीत भर पडेल आणि शेतकर्यांच्या फलउत्पादनाला अधिक चालना मिळेल, असे देखील मंत्री मलिक यांनी सांगितले. याच विषयावर किरण मोरे यांनी आज शासनाचे लक्ष कांदा उत्पादकांच्या समस्येकडे केंद्रित करण्याच्या हेतूने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. वाईन विक्री वाढल्याने जर शेतकर्यांच्या फलउत्पादनाला चालना मिळणार असेल तर कांद्यापासून देखील वाईन निर्मितीवर भर द्यावा . आमच्या कांद्यापासून देखील वाईन तयार करा. असे पत्रक शेतकरी कृषिमंत्री यांना देत असल्याचे व्यंगचित्र त्यांनी रेखाटून प्रसिद्ध केले आहे.
अवेळी पाऊस, खराब वातावरण, खतांचे वाढलेले दर, अनियमित आयात- निर्यात धोरण, विजेचे लोडशेडिंग त्यातही विजेची अनियमितता या सारख्या अनेक समस्या कांदा उत्पादकांच्या आर्थिक भरभराटीचा अडथळा बनला आहे. यामुळे कांदा उत्पादक पूर्णतः आर्थिक संकटात बुडाला आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात अनेक वायनरी असल्याने त्या गोष्टींचा विचार होतो त्याच धर्तीवर लाखो कांदा उत्पादकांचा देखील गृहीत धरण्यात यावे. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्याला योग्य बाजारभाव मिळणे गरजेचे असल्याने आयता निर्यात धोरणात सुसूत्रता येणे तर गरजेचे आहेच त्याच बरोबर कांद्यावर देखील मोठ मोठे व विविध प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे.
किरण मोरे कांदा प्रश्नावर वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्याचे काम आपल्या व्यंगचित्रातून करत असतात. याबद्दल कांदा उत्पादक संघटनेचे खंदे समर्थक किरण मोरे सांगतात की, ऊस, संत्री, द्राक्षे, डाळिंब, एवढेच काय सडलेल्या धान्यापासून जर दारू आणि वाईन निर्मिती होत असेल. तर औषधी व गुणकारी असलेल्या कांद्यापासूनही आयुर्वेदिक वाईन निर्मिती झाली तर काय हरकत आहे? तसे झाल्यास लाखो कांदा उत्पादक सुखी होतील आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर येण्यास नक्कीच मदत होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम