आढळा परिसरातील द्राक्षशेती निसर्गाच्या अवकृपेने उध्वस्त!

0
14

अकोले/प्रतिनिधी

सलग दोन वर्षे सातत्याने धोका देणार्‍या निसर्गाने यावर्षीही अकोले तालुक्याच्या आढळा परिसरातील द्राक्षशेतीला मोठा फटका दिला. ऐन हिवाळ्यात पडलेल्या पावसाने वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, देवठाण, गणोरे, पिंपळगाव येथील 250 एकर द्राक्षबागा उध्वस्त झाल्याने द्राक्षबागायतदारांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे. कधी बंगालच्या उपसागरात, कधी अंदमान बेटावर तर कधी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने ऑगस्टच्या छाटणीनंतर यंदा सलग 60 दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहिला. आता डिसेंबरच्या हिवाळी पावसाळ्यात तर सलग 24 तास पाऊस चालू राहिला. तापमान अगदी 6 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्ष फळांना मोठ्या प्रमाणावर तडे गेले. खते-औषधे-मजुरी आणि इतरही अनुषांगिक उत्पादन खर्चात 25 टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागला. अगदी चोवीस तास बारकाईने निगराणी करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्ष पीक हातातून गेल्याने द्राक्ष उत्पादक उध्वस्त झाल्याची माहिती वीरगावचे द्राक्षबागायतदार आणि अगस्ति कारखान्याचे संचालक रामनाथ वाकचौरे यांनी दिली.

आढळा परिसरात शरद सीडलेस आणि थॉमसन सीडलेस जातीच्या द्राक्षबागा उभ्या आहेत. द्राक्षाच्या घडात पाणी उतरून आता साखर उतरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. परंतु अचानक झालेल्या पावसाने थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने तापमान घसरले आणि फळांना तडे गेले. करपा, डावणी आणि थ्रीप्सचाही प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. क्रॅकिंगमुळे सत्तर टक्केपेक्षा अधिक द्राक्षफळांचे मोठे नुकसान झाले. ही फळे काढण्यासाठी आता मजुरीचाही खर्च वाढला. खराब झालेल्या द्राक्षांचा आता शेतात सडा पडल्याची स्थिती आहे. निर्यातक्षम द्राक्षे पिकवून आणि दरवाढीची शाश्वती असूनही हातात उत्पादन खर्चही पडण्याची शक्यता वाटत नाही. द्राक्षासाठी एकरी उत्पादन खर्च 3 लाख 50 हजार रुपयांचा झाला. बदललेल्या वातावरणात पीक वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्चही वाढला. वाकचौरे यांच्या बागांमधील एकावेळची औषध फवारणी साधारण 30 हजारांची होते. संततधारेच्या या पावसात पीक वाचविण्यासाठी औषधे आणि मजुरी मिळून 5 लाखांचा अधिक खर्च झाला. सध्या द्राक्षाला 100 ते 125 रुपये प्रतीकिलो असा स्थानिक बाजारपेठेचा भाव असून आंतरराष्ट्रीय बाजारात हीच द्राक्षे 175 रुपये प्रतीकिलोने विकली जातात. झालेल्या पावसाने महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पंढरपूर, मालेगाव, सटाणा, पेठ-सुरगाणा हा खास द्राक्षबागांचा पट्टा पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याने बाजारभाव अधिक भडकण्याची शक्यता असली तरी शेतकर्‍यांच्या हातात काहीही पडणार नाही.

आढळेतील द्राक्षशेतीचा पीकविमा यावर्षी घेण्यास राष्ट्रीयीकृत बँका तसेच सहकारी बँकांनीही नकार दिल्याने द्राक्ष उत्पादक अधिक खाईत गेले. देशभरात द्राक्ष पिकाचा विमा उतरविला जात असल्याने अकोले तालुक्यातच ही नकारात्मकता का आहे याचे उत्तर नाही. मागील वर्षी पीकविमा काढला मात्र त्याची भरपाई अद्यापही मिळाली नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्येच अवकाळी पावसाने आढळेतील द्राक्षशेती शंभर टक्के उध्वस्त केली होती. तीच परिस्थिती यंदाही झाली आहे. शेतीतील इतर पिकांच्या अशाश्वत बाजारभावामुळे शेतकर्‍यांनी फळबाग योजना राबविली. तेल्या, मररोग, गारपीट, अतिवृष्टीच्या तडाख्यात आढळेची डाळींब शेती उध्वस्त झाल्याने द्राक्षशेतीचा धाडसी प्रयोग शेतकर्‍यांनी केला. मात्र सलग तीन वर्षे अनियमित निसर्गामुळे ऐन बहरात आलेल्या द्राक्षबागा नेस्तनाबूत झाल्याने द्राक्षबागायतदारांची झोप उडाली आहे.

दरम्यान द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीची आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक अशोक देशमुख यांनी पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आपण प्रशासनाला देऊ असे आश्वासन यावेळी आमदार डॉ. लहामटे यांनी उपस्थितांना दिले. यावेळी अनेक संकटग्रस्त द्राक्षबागायतदारांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या.

खासदार शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला. तेल्या, मर, अतिवृष्टी, गारपीट अशी संकटे फळपीकांवर आली त्यावेळी आमच्या छोट्या वीरगावात साधारण एक कोटी रुपयांपर्यंतची मदत मिळायची. आता मात्र शेतकर्‍यांवरील संकटाकडे केंद्र सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. सलग तीन वर्षे द्राक्ष पीक उध्वस्त झाले. गेल्या वर्षीच्या पीकविम्याची भरपाई मिळाली नाही. यावर्षी तर द्राक्ष पिकाचा विमा घेण्यासच नकार मिळाला. पर्यायाने विम्याचा थोडाफार आधारही निघून गेला. याबाबत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना प्रत्यक्ष भेटून तक्रारीचे निवेदन देऊन द्राक्षबागायतदारांच्या समस्या मांडणार आहे.
– रामनाथ वाकचौरे (द्राक्षे उत्पादक)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here