मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे संपूर्ण देशाचं लक्ष सध्या राज्याकडे लागलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पेच आता एका निर्णायक वळणावर आला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून महाविकास आघाडीला धक्का मिळाला असताना बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडू मात्र फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. खरंतर सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांवर ११ जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कारवाईस बंदी घातली आहे. असं असताना दुसरीकडे, आता आगामी काळात बंडखोर गट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे किंवा राज्यपाल स्वत: त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. त्यामुळे आता राजकारणात पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.
आतापर्यंत बंडखोर गटाला फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत (Mumbai) यावं लागेल, असा दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा त्यांच्या नेत्यांकडून केला जात आहे. पण जर शिंदे गट मुंबईत आला तर मात्र यातील बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. पण ज्या वेगाने एकनाथ शिंदेंच्या गोटात बंडखोर आमदारांची संख्या वाढेतय त्यातून बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत जाण्याची शक्यता कमीच आहे.
या संपूर्ण राजकीय उलथापालथीमध्ये भाजपने स्वतःला वेगळे ठेवल्याचं पाहायला मिळतं. पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर त्यांची करडी नजर आहे. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार नसल्याचं भाजप नेते सांगत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हेच राज्यपालांना पत्र लिहून सध्याचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची दाट शक्यता आहे. शिंदेच सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत दिसत आहे. जर असं झालं तर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांसह ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे लवकरच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहात आव्हान दिलं जाऊ शकतं, असंही बोललं जात आहे. असं झाल्यास ठाकरे यांच्या विरोधात असलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना गुवाहाटीत राहून बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळेल का? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे.