देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; एकनाथ शिंदेंना मिळणार उपमुख्यमंत्रिपद – सूत्रांची माहिती


मुंबई –  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वातावरण तापलं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापनेच्या तयारीला लागले. सूत्रांच्या माहितीनुसार उद्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून एकनाथ शिंदे यांची उपमुख्मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, आज एकनाथ शिंदे मुंबईत येत असून त्याचवेळेस हे दोन दिग्गज नेते काही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यातील राजकीय गदरोळात केसरकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी लढताना आम्हाला आमच्याच नेत्याशी लढावे लागले. आमचा मूळ मित्रपक्ष हा भाजपच असल्याचे आम्ही नेहमी म्हणत आलो. आम्ही एकत्र निवडणुक लढवल्या आहे. मात्र, वेळोवेळी आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही नुकतीच येथे आमदारांची बैठक घेतली. आता एकनाथ शिंदे साहेब मुंबईला रवाना होत आहेत.

त्यापूर्वी आज सकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले की, सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.

विशेष म्हणजे पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले की, मला ह्या आकड्यांच्या खेळात पडायचे नाही. उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काम आम्ही केले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले आहे. उद्धव यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे नाव घेत आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचे आभार मानले. शिवसेनेचे नाराज आमदार अनेक अपक्ष आमदारांसोबत २२ जूनपासून मुंबईतून आधी सुरत व नंतर सुमारे २७०० किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटीमध्ये तळ ठोकून होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!